सरकारच्या तिजोरीत खडखडाट, दिवाळीत गरिबांचा आनंद हिरवणार, महायुतीची गेमचेंजर योजना बंद?

Foto
मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा सुरू आहे. काही योजनांच्या निधीवर कात्री लागल्याची चर्चा सुरू आहे. आता ऐन दिवाळीत राज्यातील गरिबांच्या चेहऱ्यांवरील आनंद हिरावला जाणार आहे. महायुती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली आणखी योजना आता अखेरच्या घटका मोजत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने मोठ्या दिमाखात सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना गुंडाळली जाणार असल्याची चिन्हे आहेत. आर्थिक चणचणीमुळे तीन वर्षांपासून ही योजना प्रत्यक्षात राबवता आलेली नाही आणि यंदाच्या दिवाळीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही योजना कायमचीच बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना आणि आनंदाचा शिधा   या योजना विशेष गाजल्या. परंतु प्रत्यक्षात निधीअभावी बहुतांश योजना अंमलबजावणीअभावी थांबल्या आहेत.

लाडकी बहीण आणि मोफत वीज यांसारख्या काही योजना सध्या सुरु असल्या, तरी उर्वरित योजनांना निधी न दिल्याने त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या योजना बंद होणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने निधी वितरित न केल्याने योजनांचा गाडा रुळावर येऊ शकलेला नाही.

आनंदाचा शिधाफ योजनेअंतर्गत शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात गरीबांना फक्त 100 रुपयांत पामतेल, रवा, चणाडाळ आणि साखर उपलब्ध करून दिली जात होती. या योजनेमुळे हजारो कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळत होता.

छगन भुजबळांनी थेट म्हटले, आर्थिक ओढाताण होत आहे

नुकताच छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठे भाष्य केले. छगन भुजबळांनी म्हटले की, लाडकी बहीण जी योजना आहे ती 35-40 कोटींवर जाते. तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की, सगळीकडेच याचा फटका बसतो. त्यामध्येच राज्यामध्ये प्रचंड पाऊस त्यामुळे शेतीची मोठी हानी झाली, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे. निश्‍चितपणे यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे. इतर काही गोष्टी करणे शक्य नाही. आमच्या विभागातर्फे दहा किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जातो आणि ते वाटप आम्ही सुरू केलंय. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यांना सरकार पाच हजार रूपये मदत देतंय. बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्‍चितपणे मदत करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न अगोदर सोडवावे लागतील.

पुढे छगन भुजबळांनी म्हटले की, शिवभोजन थाळीच्या निधीसाठी आम्हाला फार जास्त प्रयत्न करावे लागतात, हे खरं आहे. आनंदाच्या शिधाबाबत अर्थखात्याने स्पष्ट सांगितले की, यावेळी शक्य नाही. 350 कोटी एका शिधेचा खर्च जातो. सर्व खात्यांना निधीची कमतरता झाली आहे हे मी सांगू शकतो. अजित पवारांनीही सांगितले की, पैशांचे सोंग करता येत नाही. पैसे वाढले की, कुठेतरी या गोष्टी घडतात आणि ओढाताण होते.

शिवभोजन थाळीचा पूर्ण निधी अजून मिळाला नाही ...

शिवभोजन थाळीचा पूर्ण निधी अजून मिळाला नसल्याचे खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे. लाडकी बहीण योजनेवर अधिक पैसा खर्च होत असल्याने इतर विभागांना निधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेला आपल्या विभागाचा निधी वळवण्यात आल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्येच आता छगन भुजबळ देखील यावर बोलताना दिसत आहेत.